शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत फोडली काच
केंदूरच्या माजी उपसरपंचाला ऐन यात्रेवेळी पोलिसांकडून अटक
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दारु पिऊन आरडाओरडा करत गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जात कपाटाची काच फोडल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केंदूरच्या ऐन यात्रेवेळी माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
वाजेवाडी ता. शिरुर येथील चौफुला येथे काही इसम दारु पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली असता पोलीस नाईक हेमंत कुंजीर व संतोष शिंदे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता तीन इसम गोंधळ घालताना दिसून आले, दरम्यान केंदूरचे माजी उपसरपंच असलेले राजेंद्र ताठे हे पोलिसांच्या अंगावर धावून येत दमदाटी करु लागले, दरम्यान पोलिसांनी त्यांना पोलीद स्टेशन येथे आणले असे ताठे हे पोलीस स्टेशन मध्ये आरडाओरडा करत गोंधळ घालू लागले, दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, पोलीस नाईक हेमंत कुंजीर, संतोष शिंदे, पोलीस शिपाई स्वप्नील गांडेकर, अंकुश चौधरी हे त्यांना समजावून सांगत असताना ते पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन, पोलिसांना धक्काबुक्की करत गोंधळ घालू लागले, याच वेळी राजेंद्र ताठे यांनी पोलीस स्टेशन मधील कपाटाची काच देखील फोडून टाकली, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत अशोक कुंजीर रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी केंदूरचे माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे वय ४२ वर्षे रा. केंदूर ता. शिरुर जि. पुणे यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करत अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
ऐन यात्रेच्या दिवशी माजी उपसरपंच अटक . . . . . . .
केंदूर ता. शिरुर गावची आज रामनवमी निमित्त यात्रा असतानाच गावचे माजी उपसरपंच असलेले राजेंद्र ताठे यांच्यावर ऐन यात्रेवेळी गंभीर गुन्हे दाखल होत पोलीस कोठडीत आपली यात्रा साजरी करण्याची वेळ आली असल्याचे दिसून आले आहे.