नव नवीन संशोधनाशिवाय विकास अशक्य - डॉ. प्रशांत देशमुख 

पाचोड// माणसाच्या विकासामध्ये संशोधन नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे. माणसांमध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून संशोधन आणि विकास कक्ष, शिवछत्रपती महाविद्यालय आयोजित एकदिवसीय कार्यशाळा "संशोधन आणि विकास" या विषयावर घेण्यात आली. पंडित जवाहलाल नेहरू महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देशमुख यांनी मार्गदर्शनात म्हटले की, खऱ्या अर्थाने समस्यातून संशोधनाला सुरुवात होते. संशोधन आणि विकास यांच्यात जवळचा संबंध आहे. संशोधनामुळे विकासाला सतत गती मिळत राहते. देशाला आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधनाला प्रेरणा देणे आवश्यक आहे. भविष्यात वेगवेगळ्या विषयाच्या संशोधनातून समाजाच्या हिताचे निर्णय घेता येऊ शकतात. संशोधन विषय निवडत असताना संबंधित विषयाचा आवाका किती आहे. यावरून त्या विषयाची निवड केली पाहिजे. विषयाची निवड केल्यानंतर त्या विषयाचे महत्त्व त्या विषयाची गरज, संशोधनाचे उद्दिष्टे, गृहितके संशोधन पद्धती या सर्व गोष्टींचा विचार करून संशोधनाचा आराखडा तयार करावा.

 संशोधन आणि विकास या एक दिवशीय कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कोठावळे सरांनी केला. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी कोठावळे यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी. वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधन करून समाज हित साध्य करण्याबरोबर मनुष्यांचा सर्वांगीण विकास होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन आणि विकास कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी यादव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंतकुमार जैन तर आभार प्रा. तुकाराम गावंडे यांनी मानले. यावेळी मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नियुक्त बीओएस डॉ. सुरेश नलावडे सहसमन्वयक डॉ.गांधी बनायात, डॉ. संतोष चव्हाण, डॉ.उत्तम जाधव, डॉ.सुभाष पोटभरे, डॉ. ह. सो. बिडवे,प्रा.सचिन कदम प्रा.विनोद कांबळे, डॉ. विठ्ठल देखणे, प्रा.नितीन चित्ते, अनिल नरवडे, सतीश वाघ, गजानन इंगळे व यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.