विहामांडवा येथील जैन मंदिरात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न; नागरिकात भीतीचे वातावरण

पाचोड/पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील१००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात मध्यरात्री दोन-चार वाजेच्या दरम्यान चोरी करण्याचा चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विहामांडवा येथे मध्यवर्ती ठिकाणी भव्य श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे.या जैन मंदिरात महावीर खोबरे हे पुजारी आहे. खोबरे यांनी नेहमी प्रमाणे रात्री ८:३० वाजता जैन मंदिर बंद केले. गुरुवार ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता जैन मंदिरात पुजारी महावीर खोबरे आले असताना त्यांना प्रवेशद्वाराचे कुलूप तोडलेले दिसले.सदरील घटनेची माहिती धीरज कासलीवाल यांना दिली.घटनास्थळी जैन बांधव व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चोरीच्या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. विहामांडवा पोलीस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे,फौजदार सुधाकर मोहिते यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.

घटनास्थळाचे फुटेज तपासले असता दोन चोरटे कॅमेरात कैद झाले. मंदिरासमोर एक चोरटा थांबला तर दुसऱ्या चोरट्यांनी गेट समोरील cc टिव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर प्रवेशद्वाराचे गेट तोडून आत प्रवेश केला. मंदिरावरती असणारा दुसरा कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केला पण अंतर जास्त असल्याने तोडता आला नाही. त्यामुळे मंदिरावरील गेट तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.सदरील चोरीची घटना रात्री २ वाजून १५ मिनिटांनी सिसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या चोरी प्रकरणी विहामांडवा येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष दीपक कासलीवाल यांनी पाचोड पोलिस ठाण्यात चोरीच्या घटनेबद्दल लेखी तक्रार दाखल केली आहे.

फोटो ओळ:विहामांडवा :येथील१००८ दिगंबर जैन मंदिरात गुरुवारी मध्यरात्री चोरी करणारा चोरटा सी.सी टिव्ही कॅमेरात कैद झाला.