विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकाचे मोठे नुकसान
पाचोड ( विजय चिडे) पाचोड सह परिसरामध्ये सोमवारी रात्री झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोडच्या अनेक भागात गारपीट देखील झाली आहे.परिसरातील बहुतांश गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर परिसरातील वडजी येथे मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान वीज पडून दोन बैल जागी ठार झाली आहे.
सोमवारी सायंकाळी अनेक गावातील वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा, ज्वारी, गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपीटमुळे टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.अवकाळी पावसाचा फटका पाचोड सह मुरमा,कोळीबोडखा, थेरगाव ,लिंबगाव , दादेगाव,रांजणगाव दांडगा, नानेगाव ,पुसेगाव, वडजी ,हर्षी, गावतांडा, केकत जळगाव, विहा मांडवा या गावाला बसला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मार्च महिना पहिल्या टप्प्यात आला असतानाही अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात मंगळवार पहाटेपर्यंत बरसत होता. अनेक ठिकाणी गारपीट झाली. शिवाय खंडित झालेला विद्यूत पुरवठा मंगळवारी दुपारनंतर सुरू झाला. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे आल्या आहेत.