स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
“हरघर तिरंगा” उपक्रमाबाबत विविध माध्यमांद्वारे
जनमानसामध्ये प्रभावीपणे जनजागृती करा
जिल्ह्यातील प्रत्येक गाव,वाडी-वस्त्यापर्यंत तिरंगा उपलब्धतेसाठी
ध्वजविक्री केंद्र उभारा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जालना :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “हरघर तिरंगा” उपक्रमाबाबत जनमानसामध्ये विविध माध्यमांचा वापर करुन अधिक प्रमाणात प्रभावीपणे जनजागृती करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करुन देण्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये ध्वजविक्री केंद्राची उभारणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हरघरतिरंगा उपक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक व्ही.के. खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी (पंचायत) संजय इंगळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगल धुपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी, तहसिलदार संतोष गोरड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना जिल्ह्यात हरघर तिरंगा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी या उपक्रमाबद्दल जनमानसामध्ये प्रभावीपणे जनजागृती करण्यात यावी. शहरी भागामध्ये शासकीय कार्यालयांसह मोक्याची ठिकाणी तसेच ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांना झेंडा खरेदी करण्यासाठी झेंडाविक्री केंद्राची उभारणी करण्यात यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या दरानुसारच झेंडा सर्वसामान्यांना उपलब्ध होईल, यादृष्टीने काळजी घेण्यात यावी. शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. महाविद्यालयीन, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, स्काऊट तसेच शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातूनही प्रभात फेऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात यावे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश करत तिरंग्याची प्रतिकृती साकारावी.
संपुर्ण जिल्हाभरामध्ये विविध ठिकाणासह शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा विषयक पोस्टर, बॅनर्स, स्टॅंडिज, होर्डिंग लावण्यात यावेत. जिल्ह्यातील चित्रपटगृहामध्ये घरोघरी तिरंगा विषयक गाणी, जिंगल प्रसारित करण्यात यावेत. जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकावरुनही जिंगल्सचे प्रसारण करण्याबरोबरच बसेसवर बॅनर्स लावण्यात यावेत. शालेय विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत, समूह नृत्य, समूहगान, प्रश्नमंजुषा आदी उपक्रमही प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. सेल्फी विथ झेंडा हा उपक्रम राबवुन नागरिकांना त्यांचा सेल्फी अपलोड करण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे लिंक तयार करुन ती सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीरित्या व प्रभावीपणे राबविण्यासाठी या उपक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करत सर्व विभागांनी समन्वयाने हा उपक्रम राबविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******