पोलीस अधिक्षक मुंडेनी सिद्धेश्वर यात्रा महोत्सव परिसराची पाहणी
औसा प्रतिनिधी- ः- लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून दि. 18 फेबु्रवारी ते 6 मार्च या दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षानंतर यात्रा महोत्सव पार पडणार असल्याने या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभून भाविकांसह नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्या दृष्टीकोनातून यात्रा महोत्सव सुरक्षीत पार पडावा याकरीता पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी यात्रा महोत्सव परिसराची पाहणी करून कांही विशेष सुचना केल्या. त्याचबरोबर यात्रा महोत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी महोत्सव समितीने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
गत दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे विविध निर्बंध लावण्यात आलेले होते. परिणामी लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवही रद्द करण्यात आलेला होता. यावर्षी निर्बंध हटविण्यात आल्यामुळे यात्रा महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधत दि. 18 फेब्रुवारी ते 6 मार्च या दरम्यान हा महोत्सव विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समितीत्यांचे गठण करण्यात आलेले आहे. यात्रा महोत्सव लवकरच सुरु होत असल्याने यात्रा परिसराची सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी यात्रा महोत्सव पार पाडणार्या मैदानाचा फेरफटका मारून कोणत्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होणार आणि कोणतेकोणते स्टॉल उभारण्यात येणार आहेत याची माहिती महोत्सव समितीकडून घेतली. यात्रा महोत्सव निर्विघ्न पार पडावा याकरीता कोणत्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त लावावा लागेल याबाबतही निरिक्षण केले.
यात्रा महोत्सव दरम्यान भाविकांसह महोत्सवास येणार्या नागरीकांची गर्दी होऊन दुर्घटना टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे तसेच यात्रा महोत्सव सुरक्षीत पार पडावा याकरीता महोत्सव समितीने पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यात्रा महोत्सवास येणार्या नागरीकांची वाहन पार्किंगची व्यवस्थाही योग्य प्रकारे करण्यासाठी विशेष नियोजन होणे अपेक्षीत असल्याचेही अधिक्षक मुंडे यांनी सांगितले. यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, गांधी चौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक माकोडे याची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक मुंडे यांनी या दोन्ही अधिकार्यांना यात्रा महोत्सवाच्या सुरक्षतेबाबत कशा पद्धतीने नियोजन करावे याबाबत विशेष सुचनाही केल्या. यावेळी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, आर.पी. चव्हाण, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, विशाल झांबरे आदींची उपस्थिती होती.
मनपा आयुक्तांकडूनही आढावा
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव मनपा क्षेत्राअंतर्गत पार पडणार आहे. त्या दृष्टीकोनातून मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनीही याबाबत आढावा घेतला. यात्रा महोत्सव सुरु होण्याआधी परिसराची स्वच्छता योग्य प्रकारे व्हावी आणि यात्रा महोत्सव काळातही परिसर स्वच्छ रहावा याकरीता मनपाच्या स्वच्छता विभागाने विशेष दक्षता बाळगण्याच्या सुचना आयुक्तांनी या बैठकीत स्वच्छता विभागास दिल्या. त्याचबरोबर मनपाच्या माध्यमातून यात्रा महोत्सव यशस्वीपणे पार पडावा यासाठी आवश्यक असणारी मदत आणि सुविधा समितीच्या सदस्यांनी वेळावेळी सुचविल्याप्रमाणे पुरविण्यासाठी कोणतीही दिरंगाई होऊ नये अशी विशेष सुचनाही या बैठकीच्या दरम्यान प्रशासनास आयुक्त मनोहरे यांनी दिली आहे.