बुध्दिवंतांनी दिलेला कौैल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ः काळे

शिक्षक आमदार विक्रम काळे यांची लातूरमध्ये जल्लोषात विजयी मिरवणूक

औसा प्रतिनिधी -महाराष्ट्रातील पाचपैकी चार विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. बुध्दिवंत मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा आहे. येणार्‍या काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्‍वास शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.

 औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार विक्रम काळे यांची लातूर येथील गांधी चौक ते शिवाजी चौकापर्यंत शिक्षक संघटना व महाविकास आघाडीच्यावतीने विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एमआयडीसीतील जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या विजयी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने, कॉंगे्रसचे मोईज शेख, शेकापचे उदय गवारे यांच्यासह माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, मदन धुमाळ, काळे यांची निवडणुकीची एकहाती धुरा सांभाळणारे गंगाधर आरडले, प्रा. अंकुश नाडे, बाबासाहेब भिसे , डी. उमाकांत, तानाजी पाटील उपस्थित होते.

 विक्रम काळे म्हणाले, माझे वडील स्व. वसंतराव काळे यांच्या पुण्यतिथिदिनी मराठवाड्यातील शिक्षकांनी माझ्यावर विश्‍वास व्यक्त करून वडिलांना आदरांजली अर्पण केली. मी मागील सोळा वर्षांपासून शिक्षक हीच जात व शिक्षक हाच धर्म मानून काम करीत आहे. यामुळे या निवडणुकीत विजयी चौकार मारणार, याची खात्री होती. विरोधकांनी अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. विरोधी भाजपला उमेदवार न मिळणे यातच माझा विजय निश्‍चित झाला होता. माझ्याच कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याचे कारस्थान करण्यात आले. परंतु, माझे काम मला विजयी करणार, याची खात्री होती. आता शाळांना अनुदान व जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याचसोबत मी कुणाचाही दुश्मन नाही, मी सर्वांवर विश्‍वास ठेवतो, परंतु, लातूर जिल्ह्यातील काही माझ्या मानलेल्या माणसांनीही धोका दिल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले. असे करू नका, मी तुमचाच आहे. माझे चुकत असेल तर मला सांगा, पण सोडून जाऊ नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 लातूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक कॉंगे्रसच्यावतीने विक्रम काळे यांची लातूरच्या गांधी चौकातून शिवाजी चौकापर्यंत गुलालाची उधळण करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 यात जेसीबीतून गुलालाची उधळण करण्यात आली. ठिकठिकाणी काळे यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता निघालेली ही मिरवणूक रात्री आठ वाजता शिवाजी चौकात आली. शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादनानंतर मिरवणुकीची सांगता झाली. यात लातूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

---------------------------------

चौकट

विक्रमबप्पांनी लवकर मंत्री व्हावे

यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री संजय बनसोडे म्हणाले, विक्रम काळे हे महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर आमदारांचे नेते आहेत. राज्यातील सर्व शिक्षक, पदवीधर आमदार त्यांच्या नेतृत्वात प्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलने करतात. त्यांचेच सर्वांना मार्गदर्शन लाभते. आता काळे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व्हावे, ते या पदाला न्याय देतील, माझे मंत्रिपद हे वेगळ्या कारणाने मला मिळणार आहे, ते काळे यांनाही ठाऊक आहे, असे ते म्हणाले.