बहुविद्याशाखीय शिक्षण हा बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक

 धोरणाचा मुख्य गाभा  : पंडित विद्यासागर  

औसा: बहुविद्याशाखीय शिक्षण हा बदलत्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य गाभा आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर सर्वसमावेशकता आणि एकत्रीकरणाचे मोठे आव्हान असणार आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी केले. 

लातूर शहरातील श्री दयानंद सभागृहात ' बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे व आव्हाने ' या विषयावर आयोजित करण्यात आलॆल्या राज्यस्तरीय परिसंवादात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या परिसंवादाचे आयोजन रोटरी क्लब लातूर, श्री दयानंद शिक्षण संस्था, लातूर व जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, रोटरीचे प्रांतपाल रुक्मेष जाखोटिया, प्रथम संस्था, पुणे चे प्रमुख डॉ. माधव चव्हाण, प्रा. डॉ. भूषण जोरगुलवार, प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड , रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए सुनील कोचेटा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्याबरोबरच शिक्षकांकडेही संबंधित विषयांचे सखोल, परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. शैक्षणिक धोरणात बदल होणार असला तरी शिक्षक - अध्यापक कधीही नामशेष होणार नाहीत. यासाठी शिक्षकांची मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. विषयाच्या परिपूर्ण ज्ञानासोबतच शिक्षकांनी नव्या धोरणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी ताठरता सोडून लवचिकता अवलंबली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यासाठी सावधपणे पाऊले टाकणे गरजेचे आहे. कारण त्याचे परिणाम सगळ्यांवर होणार आहेत. शासनाने हे धोरण अवलंबण्याचे सूचित केल्याबरोबर काही महाविद्यालयांनी याची अंमलबजावणीही सुरु केल्याचे सांगून विद्यासागर यांनी नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी यावेळी ' विद्यापीठीय स्तरावरील शिक्षणामधील धोरणात्मक बदल ' याविषयावर उपस्थितांना अत्यंत अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. नवे शैक्षणिक धोरण रोजगाराभिमुख म्हणजे राष्ट्राला आत्मनिर्भर बनविणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. ते सगळ्यांना रोजगार, नोकऱ्या देऊ शकत नाही. व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देणारे शिक्षणच बेरोजगारी कमी करण्याकामी उपयोगी पडते. ते या नव्या शैक्षणिक धोरणामुळे साध्य होऊ शकणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर आपला देश प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करू शकणार आहे. या उलट अंमलबजावणी न झाल्यास आपत्ती ओढवण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. हे धोरण कोणत्याही विद्याशाखेला कमी लेखत नाही, हे नमूद करतानाच त्यांनी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी आपल्या विषय निवडून ज्ञान संपादन करून आपले भवितव्य उज्वल घडवू शकतो. समोर येणारी आव्हाने सक्षमपणे व समर्थपणे पेलणारे हे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. सुखदेव थोरात यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. 

या परिसंवादात रोटरीचे प्रांतपाल रुक्मेष जाखोटिया ' नवीन शिक्षण पद्धतीबाबत रोटरी क्लबची भूमिका विशद केली. डॉ. माधव चव्हाण प्राथमिक शिक्षणाची दिशा, प्रा. डॉ. भूषण जोरगुलवार यांनी ' माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण धोरण, डॉ. अशोक चांडक यांनी तंत्रज्ञानाचे महत्व, प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचे स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कोचेटा यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, जेएसपीएमचे अजितसिंह पाटील कव्हेकर यांनीही यावेळी आपली भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश दगडे यांनी तर आभार प्रदर्शन रोटरी क्लबचे सचिव श्रीमंत कावळे यांनी केले.