पुणे – २३ जानेवारी २०२३ - मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणारच असा निर्धार आज भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक माननीय खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.

विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा माजी पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. 

नामदार पाटील पुढे म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात.‌ त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे. तसेच, माननीय खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल.

बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.