क्रिकेटपूट उमेश यादवची ४४ लाखांची फसवणूक
नागपूर : टीम इंडियाचा क्रिकेटपटू उमेश यादव याची ४४ लाखांची फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी कोराडी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. शैलेश दत्ता ठाकरे (३७, रा. मॉडेल स्कुल जवळ, कोराडी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. जमीन खरेदीसाठी दिलेल्या रकमेचा वापर करुन शैलेश ठाकरे याने स्वत:च्या नावावर जमीन खरेदी करुन फसवणूक केली आहे.
उमेश यादव आणि शैलेश ठाकरे हे दोघेही मित्र आहेत. उमेश यादवची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर तो संघासोबत विविध देशांमध्ये क्रिकेटच्या सामन्यांसाठी जाऊ लागला. इकडे शैलेश ठाकरे हा बेकार होता. शैलेश बेरोजगार असल्याने उमेश यादवने त्याला १५ जुलै २०१४ रोजी व्यवस्थापक म्हणून ठेवले. तो उमेश यादवचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळू लागला. बँक खाते, आयकर आणि विविध वित्तीय आणि इतर कामे तो करायला लागला. त्याने उमेशचा विश्वास संपादन केला. उमेश यादव याने त्याला नागपुरात भूखंड घेण्याबाबत सांगितले.
कोराडी भागात त्याने भूखंड शोधला. तो ४४ लाख रुपयाला मिळणार असल्याचे त्याने उमेशला सांगितले. उमेशने त्याच्या खात्यात ४४ लाख रुपये जमा केले. उमेशऐवजी शैलेशने स्वत:च्या नावे भूखंड खरेदी केला. उमेश यादवला शैलेश ठाकरेने केलेल्या कृत्याची माहिती मिळाली. उमेशने यानंतर त्याला भूखंड नावे करण्यास सांगितले, मात्र, त्याने नकार दिला. शैलेश ठाकरेने पैसे देखील परत केले नाहीत. अखेर उमेश यादवने नागपूरमधील कोराडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी शैलेश ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.