मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने त्यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता. नवी दिल्लीत आज पांडे यांना अटक केली गेली.नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणात ईडी तसेच सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. याच प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे.

५ जुलैला त्यांना यासंदर्भात ईडीने समन्स पाठवले होते. ३० जूनला पांडे हे सेवेतून निवृत्त झाले होते. त्यासंदर्भात ते दिल्लीत ईडीच्या कार्यालयात दाखल होणार होते. तशी त्यांची मंगळवारी चौकशी झाली. त्याआधी ते महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटूनही गेले. त्यानंतर ईडीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे.

संजय पांडे यांनी २००१मध्ये पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. पण त्यानंतर त्यांनी आयटी ऑडिट फर्म सुरू केली. पण त्यांचा राजीनामा स्वीकारला न गेल्यामुळे ते पुन्हा पोलिस सेवेत रुजू झाले. त्यांनी आपल्या फर्ममध्ये आई आणि मुलाला संचालक केले. ३० जूनला पांडे हे सेवेतून निवृत्त झाले होते. २०१० ते २०१५ या कालावधीत सर्व्हर आणि सिस्टिमसाठी त्यांच्या या फर्मला कंत्राट देण्यात आले होते. यापूर्वी सीबीआयनेही या प्रकरणाचा तपास केला होता त्यानंतर यात ईडीने तपासाला सुरुवात केली.

२०२१मध्ये संजय पांडे यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. नंतर रजनीश शेठ यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्यावर पांडे यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेण्यात आली. ते मुंबईचे पोलिस आयुक्तही होते. ७६वे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.