बीड(प्रतिनिधी)शिवसेना बीड जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर लगेचच कुंडलिक खांडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु केला असून बीड तालूक्यातून तब्बल 5 हजार शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र लेखी स्वरुपात घेत आज शिवसेना सचिव संजय मोरे यांना सादर केले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ सध्या शिवसैनिकांच्या वतीने लेखी प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याचे काम जिल्हापातळीवर जोरदारपणे चालू आहे.बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी जिल्हाप्रमुख पद स्विकारुन तात्काळ शिवसैनिकांच्या गाठी भेटी घेत शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने आणि जिल्ह्यात शिवसेनेची पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी अभेद्य करण्याच्या हेतुने शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्राची मोहिम हाती घेतली आहे. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आपल्या सर्व शिवसैनिकांना सोबत घेत तालूकानिहाय शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्र भरवुन घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल 5 हजार शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र तयार झाले असून शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी मुंबई येथे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्याकडे या 5 हजार शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्राचे सादरीकरण जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. या प्रसंगी त्यांच्या सोबत गणेश उगले,भरत भाऊ जाधव,पाटोदा तालूका प्रमुख राहुल चौरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख खांडेंकडून आज पेंडगाव मध्ये महापंगत
जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बीड तालूक्यातील पेंडगाव येथील मारुती मंदिर येथे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या वतीने हिंदु संस्कृती मधील पवित्र अशा श्रावण महिन्याच्या दुसर्या शनिवारी म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी सर्व भाविकांसाठी महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व भाविकांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.