संगमेश्वर : तालुक्यातील ओझरेखुर्द येथे महाकाय अजगर खोपीत (लाकडे ठेवण्याची जागा) बसला होता. हे समजताच सर्प मित्रांशी संपर्क साधण्यात आला. सर्प मित्रांनी या अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची घटना शुक्रवारी घडली. गावातील अमोल जागुष्टे यांच्या घराशेजारी असलेल्या लाकडाच्या खोपीत अजगर जाताना अमोल यांच्या मातोश्रींना गुरुवारी रात्री दिसला. स्वस्तिक ॲकॅडमीचे सर्प मित्र राजा गायकवाड यांना याबाबत सांगण्यात आले. राजा गायकवाड यांनी या अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने या अजगराला अज्ञातवासात सोडले. हा अजगर आठ फूट लांब होता.