रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला तीन हजार ग्रामस्थांपैकी दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांनी अनुपस्थित राहून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गणसंख्ये अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
निवळी ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच हातखंबा ग्रामसभा काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी ग्रामपंचायतीची वार्षिक ग्रामसभा (२९ डिसेंबर २०२२ रोजी) सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेला जवळपास अडीज हरजारांहून अधिक मतदार ग्रामस्थांनी नाराजी दाखवत अनुपस्थिती दर्शवली. या ग्रामसभेला केवळ ५६ ग्रामस्थ उपस्थित असल्याने ग्रामसभेचा उपस्थिती कोरम पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच जिंतेंद्र तारवे यांच्या परवानगीने ग्रामसेवक पाल्ये यांनी सदर ग्रामसभा तहकूब करण्यात येते, असे घोषित केले. मात्र या सभेत गावातील जेष्ठ व सुज्ञ नागरिकांनी नाराजी दाखवून पाठ फिरवली असली तरीही गावातील तरुण व महिला वर्गाची उपस्थिती प्रामुख्याने पाहायला मिळाली.
दरम्यान अनुसूचित जाती-जमाती वस्तीमधील विकास कामांचा आराखडा तयार करण्यापूर्वी परिसरातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत विश्वासात घेत नसल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने रस्त्यासाठी स्थानिकांच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत. या अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये ग्रामपंचायतीनेच बेकायदेशीरित्या टपऱ्या चालविण्यासाठी परवानग्या दिलेल्या आहेत.
गावात सरकारी जागेत उभारलेले अनधिकृत बांधकाम, टपऱ्या, फलक हटविण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला असूनही अनधिकृत टपऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत आश्रय देण्याचे काम एक प्रकारे सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे हातखंबा ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार समोर आला.