मुंबई: महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट पसरलीय.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जातोय. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने केली जात आहेत. पाटील यांच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातील कोथरूड परिसरातील चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाच्या जवळ हे आंदोलन  करण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात ठिकठिकाणी बॅनर लालून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

तर पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळीत सावित्रीबाई फुले पुतळा या ठिकाणी विद्यार्थीच्या वतीने निषेधही व्यक्त करण्यात आला.

 औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील गोपालटी परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. अचानक कार्यकर्ते आल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आंदोलकांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.