-एफआरपी’सोबत उताराही वाढविला---

प्रतिटन १५० रुपयांची वाढ; प्रत्यक्षात मिळणार ७५ रुपयेच

औरंगाबाद(विजय चिडे)कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’त प्रतिटन १५० रुपयांची वाढ करण्यात आली. केंद्रीय अर्थविषक समितीने बुधवारी यास मंजुरी दिली. या निर्णयाने यंदाच्या हंगामात प्रतिटन २९०० रुपयांवरून ३०५० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

दरम्यान, एफआरपीत वाढ केली असली, तरी साखर उताऱ्याचा बेसही दहा टक्क्यांवरून १०.२५ टक्के केला आहे. एकीकडे प्रतिटन १५० रुपये वाढ केल्याचे सांगण्यात येत असले, तरी उतारा वाढविल्याने प्रत्यक्षात ही वाढ प्रतिटन ७५ रुपयेच मिळेल. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.कृषिमूल्य आयोगाने उसाचा वाढलेला उत्पादन खर्च, खतांचे वाढलेले दर, मशागतीसाठी येणारा खर्च विचारात घेऊन उसाच्या प्रतिटन दरात १५० रुपये वाढीची शिफारस केली होती. प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही शिफारस फारच तोकडी आहे. केंद्रीय अर्थ समितीने शिफारस स्वीकारताना ‘एफआरपी’चा मूळ बेस मात्र वाढवून शेतकऱ्यांना एका हाताने दिलासा देताना दुसऱ्या हाताने त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात खोडा घातला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केला आहे.