रत्नागिरी: जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी १५ डिसेंबरपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले होते. सोशल मीडियावर ते व्हायरल झाल्यानंतर याला तीव्र विरोध झाला. विशेषतः शहरी भागात याला जास्त विरोध आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेत जनभावनांचा विचार करून हेल्मेट सक्तीला स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रशासकीय यंत्रणेकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. त्यावरून विशेषतः शहरी भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे सक्तीच्या विरोधात सूर उमटत होते. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी सर्व यंत्रणेशी चर्चा करून सुवर्णमध्य काढला. ही सक्ती पोलिस यंत्रणेकडून शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, काल (ता. ६) डिसेंबरला पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश काढले आणि ते त्वरित सोशल मीडियावर सर्वत्र फिरले. साहजिकच याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्काळ नागरिकांकडून ह्या हेल्मेट सक्तीविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः शहरी भागातील नागरिक या सक्तीविरोधात प्रत्यक्षदेखील प्रतिक्रिया देऊ लागले. पोलिस प्रशासनाने हेल्मेटबद्दल जागरूकता निर्माण करावी; पण सक्ती करू नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून आल्या.
या आदेशाबद्दल येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून पालकमंत्री सामंत यांनी दखल घेतली. जनभावनेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि हेल्मेट सक्तीच्या आदेशाला तत्काळ स्थगिती दिली. पालकमंत्री सामंत यांनी त्वरित घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्यातील संवेदनशीलपणा व आपल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनेचा केलेला आदर पुन्हा एकदा दिसून आला. यामुळे शहरी भागातील नागरिकांनी समाधन व्यक्त केले.