वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक 10 बेडेड डायलिसीस सेंटर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून रुग्णांच्या सेवेत कार्यान्वयीत करण्यात आले आहे. एका किडनी रुग्णाच्या हस्ते फित कापून डायलिसीस सेंटर सुरु करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, किडनी रोगतज्ञ डॉ. पंकज गोटे, डॉ. मोरे, डॉ. पवार व परिचारीका श्रीमती कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डायलिसीस सेंटरचे वैशिष्टय म्हणजे हे सेंटर पुर्णत: वातानुकूलित व सेंट्रल मॉनिटरींगसहित आहे. यामध्ये एचआयव्ही आणि हिपॅटायटिस- बी व सी बाधीत रुग्णांना देखील डायलिसीसची सुविधा उपलब्ध असून 2 हजार लिटर प्रतितास क्षमतेचा अद्यावत आर ओ प्लँट आहे. अमरावती व बुलडाणानंतर वाशिम येथे हे सर्वात मोठे अत्याधुनिक डायलिसीस सुविधेचे सेंटर सुरु झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हयातील किडनीच्या रुग्णांना डायलिसीसची मोफत सुविधा मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त किडनी रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. काळबांडे यांनी केले आहे.