रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाले होते. रात्री १२ वाजताच तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्यानजिक रांगा लागल्या होत्या. 

करोनासंकटामुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंध असल्याने मोठ्या संख्येने अनुयायांना रत्नागिरी येथे येता आले नाही. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने ५ डिसेंबरच्या रात्री ९ वाजल्यापासूनच हजारों अनुयायांचे रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आगमन होताना दिसून येत होते. रत्नागिरीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे चळवळीतील कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते पुतळा परिसराच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.

दरम्यान जवळपास एक ते दोन तास शिस्तबध्द पध्दतीने डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.