रत्नागिरी: रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणासारख्या उत्तम जागी येऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे; परंतु महाराष्ट्राचा विचार करता प्रकल्प दूर जाणे हे आता परवडणारे नाही. आधीच दोन प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे प्रकल्प येण्यापुर्वीच कोकणवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोकण दौऱ्यात येथील सर्वसामान्यांची देहबोली प्रकर्षाने सकारात्मकता असल्याचे दिसून आले. त्याचा आढावा घेतल्यानंतर जानेवारी महिन्यात कुडाळला एक आणि रत्नागिरी किंवा चिपळूण दुसरी सभा घेणार आहे. तोपर्यंत विविध कार्यक्रम पक्षाकडून जिल्ह्यात घेतले जातील असे सांगत पक्षवाढीसाठी मनसे कार्यकर्त्यांना उर्जा दिल्याचे सांगितले. रिफायनरीविषयी ते म्हणाले, बारसु (ता. राजापूर) येथील रिफायनरी विरोधकांनी भेट घेतली आणि आपली मते मांडली. असले प्रकल्प कोकणासारख्या उत्तम जागी येऊ नयेत; अशी माझी इच्छा आहे. पण राज्याचा विचार करता प्रकल्प दूर जाणे न परवडणारे आहे. आताच दोन प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले. या परिस्थितीत विरोध करणे किती योग्य ठरेल. ही काळजी प्रकल्प येण्यापुर्वीच घेणे गरजेचे होते. लपून-छपुन भुरटे येतात जमिनी खरेदी करतात. त्यावेळी खबरदारी घेतली असती तर रिफायनरी प्रकल्प आला नसता. एक गठ्ठा जमिनी घेऊन परजिल्ह्यातील निघून जातात, तेव्हा कळत नाही. बाहेरील लोकं जमिनीचे पट्टेच्या पट्टे विकत घेतात आणि आपल्याला उशिराने समजते की तेथे प्रकल्प येत आहे. केंद्र व राज्य शासनाने प्रकल्प जाहीर केल्यानंतर कोकणवासीय म्हणतात जमीनही गेल्या आणि जमिनीला चांगला दरही मिळाला नाही. थोर पुरुषांवरुन सुरु असलेल्या वक्तव्यांवरुन राज ठाकरे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अपयश झाकण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन वेगवेगळे विषय काढले जात आहेत. महारांजानी जे सांगितले, घडवले ते घ्यायचे नाही, फक्त वाद घालायचे आहेत. कोणत्या तरी विषयावरील लक्ष वळवण्यासाठी हे केले जात आहे. राज्यपालांकडूनही वक्तव्य झाली आहेत. त्यांच्याकडे पत आहे, पण पोच नाही, अशी टिकाही त्यांनी केली. मध्यवर्ती निवडणुकीविषयी ते म्हणाले, गेल्या दोन ते अडीच वर्षात महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्याचे उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत मध्यवर्ती निवडणुकांचा विषय होणार नाही.