रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ८६ तर २४९ सदस्यपदांच्या जागांसाठी ४२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपली असून चार ग्रामपंचायतीमधील सरपंच एकच अर्ज असल्यामुळे बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर पाच ग्रामपंचायतीत सदस्यपदांसाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन राजकीय पक्षांची निर्मिती झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. ना. सामंत यांनीही प्रतिष्ठापणाला लावली असून प्रत्येक ग्रामपंचायतीत त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे २४९ सदस्यपदांसाठी ४२९ अर्ज दाखल झाले आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य पदे बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. सध्याची राजकीय परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या कमी आहे. उमेदवारी अर्ज भरणा करण्याची मुदत संपुष्टात आली आहे. अर्ज छाननी आणि माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी तालुक्यात सरपंचपदासाठी निवळी, निरुळ, वेळवंड, करबुडे येथे एकमेच अर्ज दाखल झाला आहे. तसेच सदस्यपदांसाठी निरुळ, करबुडे, टिके, वेळवंड, जांभारी, विल्ये या ठिकाणी एकमेव अर्ज भरला गेला आहे. तसेच निवळी, बॉंड्ये येथे एक अर्ज अधिक असल्यामुळे संबंधिताला माघार घेण्यासाठी चर्चा सुरु असल्यो समजते. दरम्यान, चांदोर येथे ९ जागांसाठी २३ उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत.