रत्नागिरी : मोहिनी मुरारी संस्थेचे संस्थापक कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या जयंतीनिमित्त मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफेच्या 'महिला विकास कक्षा' कडून 'फूड फेस्टिवल' चे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून विविध पदार्थ तयार केले होते. यात समोसा चाट, कोबी मंचुरियन, आईस्क्रीम, दाबेली, फालुदा, पाणीपुरी, भेळ, शेवपुरी असे एकूण 11 प्रकारचे चविष्ट पदार्थ स्वतः बनवून विक्री केली. विद्यार्थ्यांनी व्यावसायिकतेचा अनुभव घेण्यासाठीचा विभागाचा हेतू यशस्वीपणे सफल होण्यास मदत झाली. महागाईच्या काळात स्वस्त आणि मस्त असे खाद्यपदार्थ यावेळी खवय्यांना चाखायला मिळाले.
क्रीडा स्पर्धेनिमित्त महाविद्यालयात उपस्थित असणाऱ्या बळीराम परकर विद्यालय मुरारी तथा भाई मयेकर कनिष्ठ महाविद्यालय मालगुंड, शिरिष मुरारी मयेकर माध्यमिक विद्यालय व सुनील मुरारी मयेकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय चाफे, डॉ. नानासाहेब मयेकर महाविद्यालय विद्यालय काजुरलीच्या विद्यार्थ्यांची विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकच झुंबड उडाली.
या फेस्टिवलला संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी मयेकर उपाध्यक्ष नंदकुमार साळवी सचिव रोहित मयेकर खजिनदार ऋषिकेश मयेकर श्रीमती दीप्ती मयेकर आणि मयेकर कुटुंबीय तसेच प्रमुख उपस्थिती दर्शविणारे माणिक शेखर परांजपे आणि त्यांचे सहकारी विविध शाळांचे शिक्षक, ग्रामस्थ यांनी मनमुरादपणे पदार्थांचा आस्वाद घेतला आणि सहभागी विद्यार्थी व आयोजकांचे विशेष कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुलकर्णी यांनी केले.