रत्नागिरी : बँकानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून येणाऱ्या दहा दिवसात जिल्ह्याला प्राप्त उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अधिकाधिक प्रकरणे मंजूर होतील याचे नियोजन करावे अशा सूचना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या. 

जिल्ह्यात मंजूर प्रकरणांपेक्षा नामंजूर प्रकरणे अधिक आहेत या पार्श्वभूमीवर बँकाचे प्रतिनिधी आणि नाकारलेल्या प्रस्तावांचे अर्जदार यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. 

येथील अल्पबचत भवन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी तसेच बँक प्रतिनिधींसह शेकडो अर्जदार या कार्यक्रमास उपस्थित होते. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच पंतप्रधान रोजगार निर्मितीचा मुद्रा कर्ज कार्यक्रम यासाठी बँकांनी आठवड्यातून सलग दोन दिवस अर्ज स्विकारणे व पूर्ततेपर्यंतच्या कार्यवाहीसाठी स्वतंत्र वेळ द्यावा असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री सामंत यांनी केले. 

राज्यात सर्वाधिक अनुदान निधी रत्नागिरी जिल्ह्यास मिळाला आहे असे असताना बँकानी 1 हजार 400 पैकी 920 प्रस्ताव नाकारले याबाबत कारणे कोणती आहेत व त्यात कोणत्या मार्गाने बदल करुन मंजूर प्रकरण संख्या वाढवता येईल यावर चर्चा झाली. 

या कार्यक्रमात वितरित होणाऱ्या कर्जांची हमी राज्य शासनाने घेतली असल्याने बँकांना त्यात कोणतेही नुकसान होणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे प्रकरणे नाकारण्याची मानसिकता बाजूला ठेवून बँकानी सकारात्मकपणे काम केले पाहिजे, असेही पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले. 

कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासोबत अधिक व्यवसायाची संधी बँकांना आहे यासाठी येत्या दोन आठवड्यात बँकर्स व अर्जदार यांचे पूर्ण दिवसाचे शिबीर घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.