रत्नागिरी : आगामी निवडणुका आणि पक्षवाढीसाठी कोकण दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ४ डिसेंबर रोजी येणार आहेत. जिल्ह्यातील पक्षाची स्थिती पाहता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणाला 'बूस्टर' डोस देणार, हेच पाहायचे आहे. सिंधुदुर्गातील पक्षाचे कामकाज फारसे समाधानकारक नसल्याने कार्यकारिणीच बरखास्त केल्याने रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गेले चार दिवस ते कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात त्यांनी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा आटोपता घेऊन ते रत्नागिरी जिल्ह्याकडे निघताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली.
सिंधुदुर्गातील जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त केल्यानंतर राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांमध्येही धाकधूक वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना डोस देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पक्षाची स्थिती पाहता संघटनेत फेरबदल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे नेमके काय बोलतात, पदाधिकाऱ्यांना कोणता डोस देतात, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाअध्यक्ष पदाचा वाद तर दुसरीकडे नियुक्त्या रखडलेल्या
संघटनेत फेरबदल करताना अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून जितेंद्र चव्हाण यांना हटविण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यातून अंतर्गत धुसफूस आहे.
पक्षात फेरबदल करण्यात येत असून, नव्याने नियुक्त्या करण्यात येत आहेत. मात्र, अजूनही अनेक पदांवर नियुक्त्याच केलेल्या नाहीत. पक्षात येण्यास कोणी इच्छुक नसल्याने या पदांसाठी पदाधिकारी मिळत नाहीत, अशी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झाली आहे.