दिव्यांग व्यक्तींमध्ये सामान्य लोकांपेक्षा जास्त आत्मशक्ती आणि इच्छाशक्ती:-ऍड. मानसी म्हात्रे

अलिबाग:-अमूलकुमार जैन

दिव्यांग लोक असे लोक नसतात, ज्यांच्यात कमतरता असते, परंतु ते असे लोक आहेत जे देवाला सर्वांत प्रिय आहेत, त्यांचे भिन्न गुण आहेत. या लोकांमध्ये सामान्य लोकांपेक्षा जास्त आत्मशक्ती आणि इच्छाशक्ती असते असे प्रतिपादन अलिबाग नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा जेष्ठ विधीतज्ञ

मानसी म्हात्रे यांनी अलिबाग नगरपालिका सभागृहात आयोजित जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी व्यासपीठावर माजी नगर सेविका वृषाली ठोसर,संजना किर,माजी नगरसेवक प्रदीप नाईक,अनिल चोपडा, राकेश चौलकर अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांना संबोधित असताना माजी नगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनी सांगितले की,जागतिक अपंगत्व दिन गेल्या अनेक वर्षांपासून जगात साजरा केला जात आहे.परंतु आजही जगात दिव्यांग संबंधित अनेक समस्या आहेत. या अडथळ्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपण हा एक दिवस उत्सव म्हणून साजरा करतो.दिव्यांग हा शरीराने दिव्यांग असला तरी मनाने दिव्यांग नसतो.ज्यामुळे ते इतर लोकांपेक्षा खास बनतात, म्हणूनच अपंगांना दिव्यांग म्हटले जाऊ लागले. 

मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी सांगितले की,

दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचा विकास करावा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये या कल्पनेच्या पार्श्वभूमीवर 1981ला संयुक्त राष्ट्र महासभेने “अपंग व्यक्तींचे आंतरराष्ट्रीय वर्ष” म्हणून घोषित केले. या संदर्भात इतरही अनेक योजना तयार झाल्या. सरकार आणि संस्थांना त्यांचे उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट प्रदान करण्यासाठी 1983 ते 1992 या कालावधीत दिव्यांगांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या दशकात संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केले. त्यानंतर 3 डिसेंबर 1992 या दशक कालावधीत जागतिक अपंगत्व दिन साजरा करण्यात आला.जागतिक दिव्यांग दिन हा दरवर्षी ३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस दिव्यांग व्यक्तीबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा करण्यांत येतो. अलिबाग नगरपरिषद कार्यालयात ९८ दिव्यांग लाभार्थीची नोंदणी करण्यांत आलेली आहे. त्या अनुषंगाने आज अलिबाग नगरपरिषद कार्यालयात ३ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक दिव्यांग दिवस साजरा करणेत येत आहे.दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी अलिबाग नगरपालिका हद्दीत दिव्यांग प्रयोगशाळा उभारण्याचा मानस असल्याचे सांगत दिव्यांग बांधवांची मतदार नोंदणीसुद्धा नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.अलिबाग नगरपालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना दर तिमाही आर्थिक मदत ही दिव्यांग बांधवांच्या थेट खात्यात जमा केली जात आहे. नगरपालिकेच्या वतीने दिव्यांगासाठी विविध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते.

 जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून

 दिव्यांग लाभार्थीना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांच्या रोजच्या जीवनाउपयोगी असलेली वस्तु भेंट स्वरुपात देण्यात आली.