चिपळूण: आंबेडकरी घराण्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या पनवेल येथील जगदीश गायकवाड यांचा चिपळूण वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. संतप्त पदाधिकारी, कार्यकत्यांनी पक्षाच्या संपर्क कार्यालयात बुधवार दि. ३० नोव्हेंबर रोजी प्रचंड घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. गायकवाड याला तत्काळ अटक करा, अशी मागणी निवेदनाद्वारे चिपळूण पोलिसांकडे केली. अटक न झाल्यास थेट आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दिवंगत भय्यासाहेब आंबेडकर आणि मीराताई आंबेडकर यांनी आंबेडकरी धम्म चळवळ तसेच सामाजिक चळवळ प्रचंड कष्टाने व संघर्षातून उभी केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही चळवळ सामाजिक व राजकीय करुन सामान्य माणसाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून सामान्य माणसांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष व कष्ट केले. आजही त्याच पध्दतीने अविश्रांत वंचितांसाठी कष्ट घेत आहेत. प्रकाश आंबेडकरांवर राजकीय मतभेदातून टीका होऊ शकते. ते राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून आम्ही सहनही करतो. मात्र विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर सुपारी घेऊन तर जाणूनबुजून जर कोणी अश्लिल टीका आणि शिवीगाळ करीत असेल, तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाही. पनवेल शहरातील गद्दार जगदीश गायकवाड नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या माथेफिरुने दोन दिवसापूर्वी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आंबेडकर कुटुंबावर पातळी सोडून बेताल व्यक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर वांचत बहुजन आघाडी यांच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. इकतेच नव्हे तर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुंड प्रवृत्तीचा गायकवाड याला तत्काळ अटक करावी. शिवाय त्याचप्रमाणे सीडब्ल्यूसी नावाच्या सामाजिक वृत्तवाहिनीवरही तत्काळ कारवाई करावी, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
या वेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष महेश सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, नाना सावंत, संतोष तांबे, विलास मोहिते, अजय सकपाळ, प्रफुल्ल जाधव, सुभाष गमरे, उत्तम जाधव, सुरेश भिसे, विनोद कदम, प्रकाश पवार, राहुल गमरे, विलास सकपाळ, सुरेश सावंत, दीपेश जाधव, शक्ती जाधव, अशोक पवार, दीपेश सावंत, संजय जाधव, प्रवीण जाधव, विजय पवार आदी उपस्थित होते.