कोल्हापूर: शिवाजी पार्कजवळ इंदिरानगरातील सोनझार गल्लीतील झोपड्यांना आग लागून १५ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. कष्टाने उभारलेल्या संसाराची डोळ्यांसमोर राख होताना पाहून अनेक महिलांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. महापालिकेचे अधिकारी आणि राजकीय नेते यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

इंदिरानगरमध्ये सोनझार समाजाची वस्ती आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील संजय सोनझारी यांच्या घरातून धूर येताना दिसला. यावेळी वस्तीमधील पुरुष व महिला व्यवसायासाठी बाहेर गेल्या होत्या. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. घरांमध्ये जळणही असते. दाटीवाटीची वस्ती असल्याने आग हा हा म्हणता भडकली आणि पसरली. पाहता पाहता १५ घरांनी पेट घेतला. तेथील तरुणांनी घरातील सर्वांना बाहेर काढले. शक्य तेवढे प्रापंचिक साहित्यही बाहेर आणले. मात्र तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. त्यामुळे या प्रयत्नांना मर्यादा आल्या. लहान मुले आणि वृद्ध लोकांना मात्र त्यांनी सुरक्षितस्थळी हलवले. त्यानंतर काही जण कावळा नाका येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात गेले. त्यानंतर कावळानाका, प्रतिभानगर येथून अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी सहा बंबांसह आले.

वस्ती दाटीवाटीची असल्याने आणि रस्ता अरुंद असल्याने बंब आत जात नव्हते. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे; मात्र ॲसिडमुळे किंवा गॅसगळतीमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. आगीची माहिती कळाल्यावर कामावर गेलेले सर्व स्त्री-पुरुष परत आले. जे उरले होते ते साहित्य त्यांनी गोळा केले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंचनामे करुन प्राथमिक अहवाल बनवला.

यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, कार्यालय अधिकारी मनीष रणभिसे, प्रशिक्षित अधिकारी ओंकार खेडकर, संग्राम मोरे, अर्पिता शेलार, सैफ मालदार, शुभम कुंभार, सुशांत जोंधळे, मोहसीन पठाण, कांता बांदेकर यांच्यासह सुमारे २५ जवानांनी आग नियंत्रणात आणली. दरम्यान, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, हर्षदीप घाटगे यांच्यासह राजेश लाटकर, अनिता ढवळे, कृष्णराज महाडिक यांनी येऊन पहाणी करत नागरिकांशी संवाद साधला.

गॅस सिलिंडर हवेत उडाले

घरांमधील सिलिंडर आगीमुळे हवेत उडाले. काही सिलिंडरनी पेट घेतला; मात्र इथल्या तरुणांनी प्रसंगावधान ठेवत २० सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

झाडांनी घेतला पेट

घरांना लागूनच लिंबाचे आणि चिंचेचे झाड आहे. आगीमुळे त्यांनीही पेट घेतला होता. आगीच्या ज्वाळा उंचपर्यंत गेल्या होत्या. पेटलेल्या झाडांमुळे आगीची भीषणता वाढली.

दोन वर्षांची विद्या वाचली!

येथील एका घरामध्ये विद्या (वय २) झोपली होती. तिचे आई, वडील कामासाठी बाहेर गेले. आग लागल्याचे लक्षात येताच तरुणांनी तिला सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे तिचा जीव वाचला. आगीमध्ये लोकांना बाहेर काढताना दोघांना पत्रा लागल्याने ते जखमी झाले.