नगर: सुरतहून येत असणाऱ्या मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात नगर रोडवरील लक्ष्मी माता मंदिरासमोर मंगळवारी (दि. 29) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाला. रोहित गणेश धांगडे (वय 21), रा. गल्ली क्र. 9, पुंडलिकनगर असे या अपघातात मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे कुटुंबिय मुळचे घनसावंगी तालुक्यातील आहे. ते अनेक वर्षांपासून पुंडलिकनगरात राहतात. पाच महिन्यांपूर्वी वाळूज परिसरातील मायलॉन कंपनीत रोहित रुजू झाला होता. तो रोज सकाळी सहा वाजता दुचाकीवरुन कंपनीत जायचा. मंगळवारी देखील नेहमीप्रमाणे तो दुचाकीने (क्र. एमएच-20-एफक्यू-6230) कंपनीत जाण्यासाठी निघाला. त्याची दुचाकी नगरनाका ओलांडून छावणी रेल्वे उड्डाण पुलाजवळ आली.

याचदरम्यान औरंगाबादकडे येणाऱ्या ट्रकने (एम एच- ४६- ई एफ- ८०७८) अचानक यू टर्न घेतला आणि रोहितच्या दुचाकीला धडक दिली आणि रोहित रस्त्यावर कोसळला. याच दरम्यान रोहितच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यात तो चिरडला आणि जागीच ठार झाला. या घटनेची माहिती समजताच उपनिरीक्षक अंबादास मोरे, हवालदार के. बी. काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालक शेख शकिल (वय 27), रा. बदनापुर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आई-वडिलांचा घाटीतच आक्रोश

या अपघातात मरण पावलेल्या रोहितचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. रोहितचे वडील रिक्षाचालक आहेत. आई लता धांगडे खासगी नोकरी करतात. रोहित शिक्षण सुरु असतानाच कंपनीत काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. रोहितला एक लहान भाऊ असून तो शिक्षण घेत आहे. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. रोहितला मृत अवस्थेत पाहून त्याची आई बेशुद्ध पडली. वडील व भाऊ घाटीतच धायमोकलून रडले. नातेवाईक व रोहितच्या मित्रांनी घाटीत गर्दी केली होती.