पुसद :ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काळी दौलतखान येथे शेतात रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या भिवाजी वसंता राऊत (वय 52)याचा झोपेत डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची घटना सोमवार (दि. २८) रोजी सकाळी उघडकीस आली. 

मनीष भिवाजी राऊत यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून मृताच्या लहान भाऊ शिवाजीने खून केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आरोपी सध्या फरार आहे, अशी माहिती ठाणेदार मोतीराम बोडके यांनी दिली.

काळी येथील भिवाजी राऊत हे रविवारी रात्री शेतात कापूस पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.रात्री कापूस पिकाला पाणी दिल्यानंतर ते मध्यरात्री शेतातच चिंचेच्या झाडाखाली पलंगावर झोपले. याच दरम्यान गाढ झोपेत मारेकऱ्याने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने दोन वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. सकाळी ते घरी न आल्याने त्यांची पत्नी व मुलाने त्यांच्या मोबाईल वर संपर्क केला असता मोबाईल बंद होता. त्यानंतर त्यांची पत्नी हे सकाळी शेतात पाहायला आली, तर भिवाजी राऊत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले.

ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली, येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोपाळ चावळीकर व बिट जमादार अशोक जाधव यांना देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.