पुणे: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडली. मावळ तालु्क्यातील बावधन येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेवर सर्पदंश झाल्यानंतर उपचार सुरु होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या या शिक्षिकेची सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. या शिक्षिकेच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते आहे. पद्मा केदारी असं मृत्यू झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे.
पद्मा केदारी या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील बावधन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. दुपारच्या सुमारास जेवणाचा डबा खाण्याआधी पद्मा या हात धुण्यासाठी गेल्या. पण या दरम्यान त्यांना सर्पदंश झाला. दुपारी डबा खाण्याआधी हात धुवायला गेल्या असताना एका विषारी सापाने पद्मा केदारी यांच्या हाताला दंश केला. पद्मा केदारी या शिक्षिकेच्या दोन बोटांना विषारी सापाने लक्ष्य केलं. सर्पदंशाची जखम लक्षात येताच शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पद्मा केदारी यांच्या शरीरात विष गंभीर परिणाम करु लागलं होतं. खासगी रुग्णालयात पद्मा यांचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांकडून प्रयत्न केला जात होता. पण उपचारादरम्यान ज्याची भीती होती, तेच झालं. उपाचार सुरु असतानाच पद्मा केदारी या शिक्षिकेचा मृत्यू झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे आता परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याआधीही राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्पदंशामुळे अनर्थ घडल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. मात्र या घटना रोखायच्या कशा, असा प्रश्नही सतावू लागलाय. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेच्या आवारात सतर्कता बाळगण्याची नितांत गरज व्यक्त केली जात आहे.