शिरुर: शिरुर तालुक्यातील महसुल विभागात असलेली खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असुन शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिरुर तालुक्यातील ट्रस्टच्या जागेच्या (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने त्याच्यासाठी व वरिष्ठ अधिकार्यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत हि बाब उघड झाली आहे.
शिरुर येथील तत्कालीन तहसीलदार रंजना उमेश उमरहांडे, शिरुर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक स्वाती सुभाष शिंदे, तलाठी सरफराज तुराब देशमुख, खासगी व्यक्ती अतुल घाडगे आणि निंबाळकर यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अॅन्टी करप्शनच्या पथकाने तलाठी सरफराज देशमुख याला ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एन.ए. प्रस्ताव मंजूर करावयाचा होता. त्यासाठी तलाठी देशमुखने त्यांच्याकडे 42 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. सदरील जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी 5 लाख रूपये तर स्वाती शिंदे यांनी 1 लाख रूपयाची मागणी केली. आरोपी घाडगे आणि निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी 20 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराकडून अॅन्टी करप्शनकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदरील तक्रारीची दि. 25 मे 2022 ते दि. 19 नोव्हेंबर 2022 दरम्यान पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वजण लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज (सोमवार) दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी पाचही जणांविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरनाथ माने यांनी ही कारवाई केली.