तेलंगना: चॉकलेट म्हणजे लहान मुलांसाठी जीव की प्राण. लहान मुलं कितीही रडत असली तरी एक चॉकलेट दिलं की, लगेचच शांत होतात. अनेक मोठ्या व्यक्ती देखील चॉकलेट खाण्याचे हौशी असतात. अशात तेलंगणा राज्यात याच चॉकलेटमुळे मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका ८ वर्षीय मुलाचा चॉकलेट खाल्याने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील वारंगळ शहरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. संदीप सिंह असे मृत मुलाचे नाव आहे. या चिमुकल्याच्या बाबांनी परदेशाहून काही चॉकलेट्स आणले होते. बाबांनी आपल्यासाठी एवढे चॉकलेट्स आणलेत हे पाहून तो खूप खुश झाला. त्याने पटकन चॉकलेटचा तुकडा तोडला आणि तोंडात टाकला.

हेच चॉकलेट थेट त्याच्या श्वासनलिकेत अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. कुटुंबीयांना हे समजाच त्यांनी त्याच्या तोंडातून चॉकलेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चॉकलेट मोठं असल्याने ते त्याच्या श्वासनलिकेतून पुढे ही जात नव्हते आणि बाहेरही येत नव्हते. यामुळे संदीपला गुदमरू लागले.

श्वास घेता येत नसल्याने तो जागेवरच तरफडू लागला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले. या घटनेने संदीपच्या आई बाबांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.