राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. याच दरम्यान आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक जुना फोटो ट्वीट केला आहे. हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?, असा सवाल देखील विचारला आहे.
उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना… आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???, असे मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.