सारोळा: भोर तालुक्यातील भांबवडे येथे शेतीच्या वादातून महिलेला वीजेचा शाॅक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय निवृत्ती सुर्वे (वय 38), रा. भोंगवली, ता. भोर यांच्या विरोधात राजगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्वे यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि आरोपी विजय सुर्वे यांचे शेत एकमेकांच्या शेजारी आहे. सुर्वे याने फिर्यादी महिलेच्या दीराकडून दीड गुंठे जमीन घेतली आहे. त्यामधील विहीरीतील पाण्यावरून दोघांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद न्यायालयात सुरु आहे. मात्र सुर्वे यांनी विहिरीतील पाणी घेण्यावरून फिर्यादी महिलेला सातत्याने धमकी दिली. तुझी समाधी याच शेतात बांधली जाणार, अशी धमकी दिली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे फिर्यादी महिली शेतात पीकाला पाणी देण्यासाठी गेल्या असता त्यांना शाॅक लागला. त्याठिकाणी तार असल्याचे दिसून आले.

तार कोठून आली याबाबत माहिती घेतली असता ती आरोपी सुर्वे यांच्या शेतातून आली होती. त्यावरून सुर्वे यांनीच आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा संशय बळावला व महिलेने पोलीसांत तक्रार दाखल केली. याबाबत सुर्वे याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व सहकारी करत आहेत.