दिवसेंदिवस रिफायनरी विरोध वाढत आहे. पुऱ्या देशभरातील कोकणावर प्रेम असणाऱ्या चाकरमान्यांनी अर्थात रिफायनरी विरोधकांनी सोशल माध्यमांवर #saynotorefinery असा Hashtag चालवत आपला विरोध दर्शवत आहे. तर दुसरीकडे रिफायनरी विरोधी संघटनेच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोण आमदार, जो जनतेला विश्वासात न घेता 'रिफायनरी'ची दलाली करतो, आम्ही त्यांना ओळखत नाही. एवढी रिफायनरी विरोधी आंदोलने झाली. तेव्हा हे आमदार कुठे होते. असा थेट सवाल रिफायनरी विरोध करणाऱ्या महिलांनी केला आहे.
रिफायनरीचे समर्थन केले म्हणून आ. राजन साळवी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात राजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. यापुढे आक्रमक झालेल्या महिला म्हणाल्या, विकास काम सोडा, जेव्हा 'रिफायनरी'चा विषय येतो तेव्हाच हे 'धूमकेतू'सारखे प्रगट होतात. जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे आणि त्यांचे दोन चिरंजीव तसेच उद्योग मंत्री उदय सामंत टीका करतात तेव्हा कुठे असतात हे आ. साळवी ? फक्त रिफायनरीसाठी यांच्या गळ्यात गळा घालून बैठका घेण्यात त्यांना जमतं का? एवढेच नाही तर आ. साळवी यांना आमच्या मागण्या मांडण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल उपस्थित केला आहे. जमीन आमच्या हक्काची आहे. कोणाच्या बापाची असेल तर बारसू सोलगाव पंचक्रोशीत येऊन दाखवावे. असे थेट आव्हान आक्रमक महिलांनी दिले आहे. मुंबईला जाऊन दलाली करून संमतीपत्रे देऊ नयेत, अशी संमतीपत्रे आणि ग्रामपंचायतीचे बोगस ठराव आजपर्यंत डब्यात गेले आहेत. त्यामुळे जनतेच्या विरोधात जाऊन रिफायनरीची दलाली कुणी करु नये. आमचा रिफायनरीला आता आणि यापुढेही विरोधच असणार आहे असे महिलांनी ठणकावून सांगितले आहे. आधी सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना तडीपारीच्या नोटीसा, आता गोरगरीब शेतकऱ्यांच्या महिलांवर गुन्हे दाखल झाले, अहो, शिंदे- फडणवीसजी आपले सामान्य जनतेचे हेच का सरकार ? गुन्हे कितीही दाखल करा, आता 'रिफायनरी' विरोधी माघार कधीच घेतली जाणार नाही, याबरोबर या पुढेही शिवसेना आ. राजन साळवींच्या विरोधात आंदोलन करणारच असे बारसू- सोलगाव पंचक्रोशीतील महिला माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
अप्पर जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) अन्वये मनाई आदेश दि. २३/११/२०२२ रोजी ते दि. ०७/१२/२०२२ रोजीचे मुदतीत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश जारी असताना आ. राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्याने त्यांच्या पुतळ्याला चपलांचे हार घालून, चपलांचा थोबाडावर मार देऊन शेण फासून व त्यांच्या नावाच्या घोषणा बारसु सोलगाव पंचक्रोशीतील शिवणे खु, गोवळ येथील ग्रामस्थांनी दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी निषेध केल्याने गोवळ खालचीवाडी येथील सुमारे ७० ते ८० महिला व सुमारे ३० ते ३५ पुरुष तसेच शिवणे खुर्द होळीचा मांड येथील सुमारे ३० ते ३५ महिला व सुमारे २० ते २५ पुरुष यांच्या विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण या करीत आहेत. दरम्यान, हे गुन्हे दाखल झाल्याने येथील महिला आता अधिक आक्रमक झाल्या आहेत.