अनेक अडचणींवर मात करीत आणि प्रचंड मेहनत घेत तयार झालेला जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस’ आंबा वाशी फळबाजारात रवाना झाला. तालुक्यातील कातवण येथील दिनेश दीपक शिंदे आणि प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसची दोन डझनची या हंगामातील पहिली पेटी आजच्या मुहूर्तावर फळबाजारात पाठवली.
ऐन नोव्हेंबरमध्येच हापूसने मुंबई बाजार गाठल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे.
थंडीच्या सुरुवातीला झाडांना पालवी येते. त्यानंतर मोहोराची चाहूल लागते. मोहोर टिकवून फलधारणा होण्यासाठी बागायतदार फवारणी करतात. त्यानंतर आंबा पीक बाजारात जाते, असे सर्वसाधारण व्यवस्थापन चालते; मात्र अलीकडे शेतकरी निसर्गालाही साथीला घेतात. काहीवेळा पावसाळ्यात आलेला मोहोर टिकवून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. यातून हंगामाआधी आंबा पीक घेता येते. हेच तंत्र तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आत्मसात केले.