रत्नागिरी, ( वा. ) वादग्रस्त एलईडी फिशिंगला रत्नागिरीत सुरुवात झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरकरवाडा बंदरात राजरोसपणे एलईडी लाईट, त्यासाठी लागणारे साहित्य नौकांवर उतरवले जात आहे. या प्रकारामुळे मच्छिमारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून एलईडीविरोधात आता पारंपारिक मच्छिमारांचा एल्गार उभा राहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एलईडी फिशिंगला यापूर्वीच जोरदार विरोध झाला होता. शासनाने देखील एलईडी फिशिंगला बंदी घातलेली आहे. असे असताना शासनाची बंदी न जुमानता सर्व आदेश धाब्यावर बसवून रत्नागिरीत अनेक नौकांवर एलईडी लाईट लागले आहेत. खोल समुद्रात एलईडी लाईटवर मासेमारी सुरू झाल्याने पारंपारिक मच्छिमारांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

गतवर्षी याच एलईडी फिशिंगविरोधात पारंपारिक मच्छिमारांनी आंदोलन छेडले होते.कोणत्याही परिस्थितीत एलईडी फिशिंग करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका पारंपारिक मच्छिमारांनी घेतली होती. त्यामुळे रत्नागिरीत एलईडी विरुद्ध पारंपरिक मच्छिमार असा संघर्ष पहायला मिळाला होता. या एलईडी मासेमारीला बंदी असतानादेखील आज अनेक मच्छिमार आपल्या नौकांवर एलईडी लाईट लावून मासेमारी करीत आहेत. रत्नागिरीत एलईडी लाईटवर मासेमारी सुरू झाल्याची माहिती पारंपारिक मच्छिमारांपर्यंत येऊन पोहोचताच मच्छिमारांनी त्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एलईडी मासेमारीला बंदी असताना कोणाच्या आदेशाने ही एलईडी मासेमारी सुरू झाली आहे? अनधिकृतरित्या एलईडी लाईट लावून मासेमारी होत असताना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त करतायत काय ? असा सवाल आता पारंपारिक मच्छिमारांनी उपस्थित केला आहे. जर ही मासेमारी बंद झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मच्छिमारांनी दिला आहे.