महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली आहे. तसेच भाजपाचे एक प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनीही अकलेचे तारे तोडत शिवरायांबाबत गरळ ओकली आहे. एवढे होऊनही भाजपाचे नेते त्याचा निषेध न करता या दोन व्यक्तींचा निर्लज्जपणे बचाव करत आहेत. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त निवडणुकीत मतांसाठी हवेत, या दोघांवर कारवाई झाली पाहिजे, असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरशेचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याआधी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचाही अपमान केला आहे. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या छिंदम प्रवृत्ती भाजापामध्येच आहेत पण त्याचा निषेध केला जात नाही. सर्व महाराष्ट्रातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात असताना भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्यापासून अनेक नेत्यांना यात छत्रपतींचा अपमान वाटत नाही. उलट हे नेते कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीचा बचाव हिरीरीने करत आहेत. हे हीन पाळतीचे राजकारण आहे. हा प्रकार अनवधानाने झालेला नसून जाणीवपूर्वक केलेला आहे. भाजपाच्या या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला पाहिजे. आपली दैवते व महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने महाराष्ट्रातून हाकलून द्या तसेच प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्यावरही कारवाई करा, अशा मागणी राजहंस यांनी केली आहे.