शिरुर: नुकतेच डोंगरगण येथे वाळूमाफीयांनी वाळू उपसा करुन वाळू वाहतुक करताना त्यांचा रस्ता एका शेतकऱ्याने अडवल्याने त्याला जबर मारहाण करुण गंभीर जखमी केले आहे. त्याबाबतचा गुन्हा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. असा गंभीर प्रकार घडत असताना तेथील मंडल अधिकारी, तलाठी हे काय करत होते?
गेले अनेक वर्षापासून डोंगरगण, टाकळी हाजी, शिनगरवाडी येथे वाळूचा , मुरुमाचा बेसुमार ऊपसा होत असून मंडल आधिकाऱ्याच्या आशिर्वादाने हे सर्व प्रकार घडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. या जबाबदार आधिकाऱ्याची तात्काळ बदली करून चौकशी होऊन दुसऱ्या मंडल आधिकारी, तलाठ्यामार्फत सदर ठिकाणच्या ऊत्खननाचे पंचनामे होणे गरजेचे आहे.
नुकतेच काही महिन्यांपुर्वी महसुलमंत्री यांनी ज्या सजाच्या ठिकाणी वाळूचे बेकायेदशीर उत्खनन होताना आढळत्यास तात्काळ त्या सजातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे फर्मान सोडले होते. त्याची आता महसूल विभाग अमंलबजावणी करणार का ?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या मंडल आधिकाऱ्याने नोंदीसाठी अनेक जणांना छ्ळल्याची चर्चा बेट भागात रंगली असून अनेक जणांनी नाव न छापणाच्या अटीवर आम्हाला कसे लुटले याची हकीगत फोनवरुन, प्रत्यक्षात शिरुर तालुका डॉट कॉमच्या प्रतिनिधींना सांगितली आहे. अश्या गब्बर झालेल्या स्थानिक मंडल आधिकाऱ्याच्या विरोधात जनतेचा रोष प्रंचड वाढला असून त्याच्यावर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.
(क्रमश:)