बीड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यावरून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या प्रतिकृतीला जोडेमारो आंदोलन सोमवारी करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कोशारी व सुधांशु ञिवेदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

महाराष्ट्राची शक्तिस्थानी असलेल्या विविध महापुरुषांबद्दल सातत्याने भगतसिंग कोशारी गरळ ओकतात, कोशारी यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मराठवाड्यात आक्रमक झाली असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यावरून संभाजी ब्रिगेडने सोमवारी शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात जोडेमारो आंदोलन केले. दरम्यान कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत काही लोक सातत्याने चुकीचे बोलतात व लिहितात, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. एवढेच नाही तर कुठल्याही संविधानिक पदावर कोशारी सारख्या व्यक्तीला ठेवू नये, तात्काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कोशारी यांची हकलपट्टी करावी, अशी मागणी देखील संतप्त पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजी मुळे माने कॉम्प्लेक्स परिसर दणाणून गेला होता.

यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष अ‍ॅड.राहुल वाईकर, जिल्हा अध्यक्ष प्रा. महेंद्र मोरे , माझी तालुकाध्यक्ष मा.सुरेश बंड, उपअध्यक्ष मा.गणेश गवळी, मा.आरबाज शेख, संघटक मा.रंगनाथ फाटक, सदस्य मा.लक्ष्मण परबळे, तालुकाध्यक्ष राहुल डावकर, ता. उपअध्यक्ष मा.राजेश बनकर, ता. सहसचिव मा.शिंदे बळीराम, शहर अध्यक्ष जिवन घोलप व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते.