मुंबई-गोवा महामार्गासाठी आता कोकणवासीय चाकरमानी एकवटले आहेत. मुंबईत झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात मंत्रालयासमोर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची तयारी चाकरमान्यांनी केली आहे. जनआक्रोश मेळाव्याला चाकरमान्यांची मोठी उपस्थिती होती. सुमारे बारा वर्षापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू झालेले काम एक तप उलटले, तरी अपूर्ण अवस्थेत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे आजपर्यंत अपघाताच्या दोन हजारांच्या वर नागरिकांचे बळी गेले असून पाच हजारांच्या वर प्रवासी जायबंदी झाले आहेत. कोकणातील विविध संस्था, संघटना यांच्यावतीने आजवर अनेक अर्ज विनंत्या केल्या असून त्याला शासन, प्रशासनाने केराची टोपली दाखवली गेली. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती असे नाव विचारात आणले आहे.