मुंबई : बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.

तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजन साळवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन, पाणी पुरवठा आदी मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोठणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्यात येईल आणि या भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल.

या भागातील 70 ते 80 टक्के शेतकरी आणि स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दाखविला आहे. या प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, तसेच एकूण पॅकेजची माहिती शेतकऱ्यांना, स्थानिकांना देण्यात येईल”, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण 6200 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 2900 एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत.