चिपळूण : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत उद्योग खात्याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. श्वेतपत्रिकेवर आमची कडक नजर असणार आहे. यामध्ये मागचे उकरून काढण्यापेक्षा तुम्ही नव्याने काय उद्योग करणार आहात ते मांडा. राज्यात राहू दे, कोकणात तरी नवीन उद्योग आणून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्या. कोकणात पर्यावरणपूरक उद्योग कोणते आणणार ते आधी सांगा. मात्र, त्यात श्वेतपत्रिकेत उणिवा असतील तर मात्र कामगार संघटना म्हणून आम्हाला लक्ष घालावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष व आमदार सचिन अहीर यांनी चिपळुणातील कोकण विभागीय कोकण मेळाव्यात दिला.

शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचा विभागीय मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्याला कोकणचे उद्योगमंत्री लाभलेले आहेत. ते कोकणाबाहेर जाऊन बेबंदशाही करू नका, असे इशारे देतात. तालुका संघटनेत वाद निर्माण करतात. त्यांनी आधी कोकणात किती उद्योग आणणार ते सांगावे. येथे उद्योग आले तर बेरोजगारी कमी होईल. येथील माणूस बाहेरगावी जाऊन काम करतो. ती शोभनीय गोष्ट नाही. त्यामुळे येथील बेरोजगारांना काम मिळण्यासाठी उद्योग आले पाहिजेत. सध्याच्या स्थितीला उद्योजक मालकच कामगारांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. बहुतांशी असंघटीत कामगारांना कामगार कायद्याचे ज्ञान नाही. येऊ घातलेला कामगार कायद्याची माहिती कामगारापर्यत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध आहोत. अनेक उद्योग राज्यात येण्यास उत्सुक होते. मात्र, त्यांना आवश्यक तेवढी जमीन मिळत नसल्याने आमच्या सरकारच्या काळात चांगला दर देऊन जमिनी संपादित केल्या. नवीन औद्योगिक वसाहत होताना तिथे प्रशिक्षण संस्था व्हायला हवी. तरच तिथे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील. केंद्राचा कामगार कायदा विद्यमान राज्य सरकार जर लागू करणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील. संख्येच्या बळावर कायदा लागू झाल्यास रस्त्यावर उतरू संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी कामगार कायद्याची सविस्तर माहिती दिली. सभेत केलेल्या चार ठरावांचाही त्यांनी स्पष्टीकरण दिले. सध्या कामगार हिताचे कायदे मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. सरकारचा कंपनी मालकांवर अंकुश असायला हवा तरच कामगार टिकतील. सर्व कामगारांना एकत्र घेऊन पुढे जावे लागेल.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, जी. बी. गावडे, संजय कदम, निवृत्ती देसाई, राजन लाड, सिद्धार्थ मोरे, सुनिल अहिर, अण्णा शिर्सेकर यांच्यासह पदाधिकारी व राज्यभरातील कामगार उपस्थित होते.