शिरुर: शिरुर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी मंडल आधिकारी कार्यक्षेत्रात टाकळी हाजी सह डोंगरगण, शिनगरवाडी येथे राजरोसपणे अनाधिकृतरीत्या मुरूम उपसा, वाळू उपसा सुरु असुन तेथील तलाठी, मंडल अधिकारी आर्थिक तडजोडीमुळे मात्र मुग गिळून गप्प असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. तसेच नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, तहसिलदार यांच्या आदेशाच्या नोंदी तलाठ्यांनी टाकल्यानंतर प्रमाणित करण्यासाठी मंडल आधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याची तक्रार परीसरातील नागरीक करत आहे.
टाकळी हाजी परीसरात सध्या रस्त्यांची, तसेच नवीन बांधकामे सुरु आहे. त्यासाठी अनाधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास वाळू उपसा ,मुरुम ऊपसा जोरदाररीत्या सुरु आहे. तातडीने बेकायदेशीररीत्या उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्यांचे पंचनामे करुन योग्य कारवाई करण्याची मागणी टाकळी हाजी परीसरातून होत आहे. डोंगरगण येथे दि. २० रोजी वाळू काढण्यासाठी एका वाळूमाफीयाला एका शेतकऱ्याने रस्ता न दिल्याने वाळूमाफीयाने त्या शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. तो शेतकरी सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या माफीयांवर कारवाई करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असून तहसिलदार यांनी या प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.