रत्नागिरी :शिंदे गट आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत याच्यावर जोरदार प्रहार केला आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लोकांचा पाठिंबा वाढत आहे. जिल्ह्यातून वाढता ओघ लक्षात घेता पालकमंत्री उदय सामंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आता निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे भविष्यातील निवडणुकीचा धोका लक्षात घेऊन सामंत हे अधिकारांचा गैरवापर करीत शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याना त्रास देत आहेत. यापुढे असेच चालू राहिल्यास खासदार विनायक राऊत व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन जशासतसे उत्तर देऊ असे राजन साळवी यांनी ठणकावले आहे. मुंबईला जाताना रेल्वेस्थानक परिसरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
राजन साळवी पुढे म्हणाले, जिल्हा व तालुकापातळीपर्यत शिंदे गटात पदाधिकारी जात नसल्याने त्रास देण्याची भूमिका रत्नागिरीत सुरु आहे. रत्नागिरीतील चिरेखाण मालक, ठेकेदार व अन्य व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत असल्याचा आरोपही साळवी यांनी केला. जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यामध्ये जास्तीतजास्त ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकेल असा विश्वासही साळवी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी बारसू रिफायनरीबाबत भूमिका मांडताना मंत्री उदय सामंत यांना सहकार्य राहणार असल्याचे म्हटले आहे. नाणारमध्ये नागरिकांची घरे, मंदिरे जात होती. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध होता. बारसु-सोलगावमध्ये घरे, मंदिरे जात नसून ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. विरोध करणाऱ्याची भूमिका समजावून घेतली जाईल. आता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्रीपदाचा कारभार आहे. हा प्रकल्प झाल्यास राजापूरच्या विकासाला वेग मिळेल. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा विकास होईल, त्यामुळे रिफायनरीसाठी आपले उद्योगमंत्र्यांना सहकार्य असल्याचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले.