पुणे: नगर-पुणे महामार्गावर चास घाटातील एका वळणावर भरधाव वेगातील कार उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात अजित दीपचंद पटेल (वय-२४), विकास रामनारायण विश्वकर्मा (वय-२१, दोघे रा. जय्यतपूर,मध्यप्रदेश, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे युवक मयत झाले आहेत. तर रामनारायण श्रीबालमुकुंद मेहेरा (वय-२६, रा. शिरूर) व मुकेश गोरख पाटील (वय-२८, रा. कासौदा, जि. जळगाव, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत व जखमी हे चौघे एकमेकांचे मित्र असून ते कामानिमित्त कारेगाव व शिरूर येथे राहत होते. ते सर्व त्यांचा मित्र आनंदा नाईक (रा. चाकण, ता. खेड) याची मारूती ८०० कार (क्र. एम एच १४ ए ई ११०३) घेवून कारेगाव येथून शिर्डीकडे दर्शनासाठी चालले होते.
पहाटे २ च्या सुमारास त्यांची कार चास जवळील घाटात आल्यावर वळणावर भरधाव वेगातील कारवरील चालक मयत अजित पटेल याचे नियंत्रण सुटले व कार पलटी झाली. या भीषण अपघातात दोघाजणांचा जागेवरच मृत्यू झाला.
तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी रामनारायण मेहेरा याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालका विरूध्द अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविला आहे.