रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर बेळगाववरून रत्नागिरीकडे जाणारी बसला आज गुरूवार (१७ नोव्हेंबर २०२२) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेळगाव, कर्नाटक डेपोची बस असून आंबा घाट उतरल्यानंतर साखरपा जाधववाडी येथे उलटली त्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. ही बस पेटत असताना देखील स्थानिक ग्रामस्थांनी धाडस दाखवले व बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळवले. दरम्यान, प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. रत्नागिरीकडे येणारे एकूण 13 प्रवासी बस मध्ये होते. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

यापूर्वी राज्याच्या अनेक भागांमध्ये एस टी महामंडळाच्या बसने पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे एसटी महामंडळाचे सुदैव असले, तरी दरवेळीच पारडे त्यांच्या बाजूने राहील याची शाश्वती नाही. भविष्यातील कोणतीही कटू घटना घडण्यापूर्वीच खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे.

हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची खबर मिळताच तातडीने स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. बसमध्ये अडकेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. गाडीने पूर्ण पेट घेतल्याने हवेत धुराचा लोड पसरला होता. मात्र सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दोन रुग्णवाहिकेतून साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताबाबत अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत.

प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळण्याचा धोका

काही तांत्रिक समस्यांमुळे आग लागली असावी, अशी साचेबद्ध आणि ठेवणीतील उत्तरे देण्यापेक्षा या आगी सारख्या का लागतात, याच्या कारणांचा शोध घेणे आणि विश्वासाने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनातील भीतीचे सावट दूर करणे, याला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास, संपाच्या कालावधीत आधीच दूर गेलेला प्रवासी अशा घटनांमुळे एसटीऐवजी पुन्हा खासगी गाड्या अथवा खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळण्याचा धोका आहे. त्यातून पुन्हा एसटीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे; त्यामुळे सरकारने एखादी घटना म्हणून याकडे पाहण्यापेक्षा, त्यांची गंभीर दखल घेऊन एसटी बस अधिक सुरक्षित होतील, यासाठी उपाययोजना कराव्या. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे एसटीचे ब्रीदवाक्य खरेतर ‘प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी’ असे होण्याची गरज आहे.