पुणे: पुणे महापालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजता वाजता थंडावत गेले. आरक्षण आणि प्रभाग रचना या दोन मुद्यांवर निवडणूक गेली वर्षभर लांबली आहे. त्यातच आता “देवालाच ठाऊक निवडणूक कधी होणार’ असे राजकीय वक्‍तव्य केली जात असून निवडणूक अगदी देवाच्या हवाली सोडली गेली आहे. परंतु, यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील आजी-माजींसह “इच्छुक’ उमेदवारांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

ओबीसी आरक्षण तसेच नवी-जुनी प्रभाग रचना यात अडकलेली महापालिका निवडणूक आता नेमक्‍या कोणत्या कारणाने लांबत आहे. शिंदे-फडणवीस गटाकडून ही निवडणूक लांबवली जात असल्याचे विरोधक सांगत असताना प्रत्येक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसह निवडणूक तारखा केंव्हाही जाहीर होऊ शकतील, अपेक्षा असणाऱ्यांच्या इच्छेवर बावनकुळे यांच्या “स्टेस्टमेंट’नंतर “पाणी फिरले’ आहे.

पक्षाचे “लेबल’ नसलेल्यांची अडचण….

कोणत्याही पक्षाचे “लेबल’ नसलेले अनेक इच्छुक उमेदवार आपण निवडणूक लढणार नसल्याचे वरवर सांगतात. परंतु, अशांपुढेच मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाचे “लेबल’ नसल्यामुळे अशा इच्छुक उमेदवारांना सर्वच पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावे लागत असून प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावावी लागत आहे. विशेष, म्हणजे पक्षाचे वरिष्ठ अशांना “टार्गेट’ करून काही कार्यक्रमाचा खर्च त्यांच्या माथी मारत आहेत.

जुन्या-जाणत्यांना फायदा…

महापालिकेत जाण्यासाठी अनेक नवे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. परंतु, गेल्या वर्षभरात अशांची संख्या कमी झाली आहे. याचा फायदा त्या-त्या भागात प्रबळ असलेल्यांना होणार आहे. त्यामुळे अशा जुन्या-जाणत्यांनी आजही सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. “प्रसिद्धी’च्या झोतात राहत आहेत. त्यामुळे निवडणूक लांबल्याचा नव्यांना नव्हे तर जुन्या उमेदवारांना चांगला लाभ होईल, असेही सांगितले जात आहे.