वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे 

जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आपल्या समर्थकांसह मतदारांमध्ये जाऊन ठोंबरे यांच्या प्रवेशाबाबत येत्या पंधरा दिवसात त्यांची मते जाणून घेणार असल्याचे सांगितले. मतदारांना ठोंबरे यांचा पक्षप्रवेश मान्य नसल्यास आपल्यासाठी शिंदे सेना सोडून उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपा. एमआयएम व बहुजन समाज पक्षाचे पर्याय खुले आहेत असे प्रतिपादन केले. पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर चिकटगावकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड प्रताप निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर बापू पवार, रिखबदास पाटणी, मंजाहरी गाढे, राजेंद्र मगर,उत्तम निकम, प्रशांत शिंदे, प्रेम राजपूत, साईनाथ मतसागर, अमोल बावचे, प्रभाकर बारसे आदींसह समर्थकांची उपस्थिती होती. चिकटगावकर म्हणाले, २००९ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर या मतदारसंघातील मतदारांनी मला तब्बल ५० हजार मते दिली. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आर.एम. वाणी यांच्यासमोर केवळ १२२५ मतांनी माझा पराभव झाला. त्यामुळे मला ५० हजार मते देणाऱ्या मतदार राजाला ठोंबरे यांच्या प्रवेशाबाबत विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१४ च्या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करत काँग्रेसला विरगाव व लासुरगावच्या जागा दिल्या. त्यात कॉग्रेसच्या प्रत्येकी एक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडुन आला. असे असतांना उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेची हातमिळवणी करून दगा दिला असा आरोप त्यांनी केला. मग अशा दगाबाजांना पक्षात घेऊन काय साध्य होणार असा सवाल चिकटगावकर यांनी उपस्थित केला.

हे तर चव्हाणांचे षडयंत्र!

पंकज ठोंबरे यांच्या प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट चिकटगावकर यांनी केला. जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत निवडणुकीआधी स्वतंत्र गट निर्माण करून तिथे त्या आमदाराला पाडायचे असे चव्हाण यांचे धोरण असुन त्यांनी याआधी पैठणचे आमदार वाघचौरे व कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांना याच पद्धतीने पाडले आहे. तोच कित्ता आता वैजापुरमध्ये गिरवुन वैजापुरमध्येही राष्ट्रवादी कॉग्रेसचा आमदार होऊ द्यायचा नाही या दृष्टीने त्यांनी ठोंबरेचा गट निर्माण केला आहे असे चिकटगावकर म्हणाले  .