पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातून पुन्हा एकदा हत्येचा थरार उघडकीस आला आहे. एका सराईत गुन्हेगाराचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला आहे.

कोंढवा येथील अशोक सोसायटी जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमित उर्फ मोन्या काकासाहेब जाधव (रा. शिवनेरी नगर, गल्ली न 15 ,रिलायन्स टॉवर) असे खून झालेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सुमित उर्फ मोन्या हा सराईत गुन्हेगार होता. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तो अशोका म्यूज सोसायटी जवळील कचरा डेपो समोरुन जात असताना अज्ञात आरोपीने त्याच्यावर सपासप कोयत्याने वार केले. या घटनेत सुमित याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.